Home > Press > “शेतकरी मित्र” केंद्राची स्थापना
“शेतकरी मित्र केंद्र” दिशादर्शक ठरेल
–         क्रीडा समीक्षक सुनंदन लेले 
उस्मानाबाद, दि. 01 :-  जिल्हयातील शेती व शेतकरी वर्गांचे प्रश्न सोडवण्याकरीता“शिवार संसद युवा” चळवळीद्वारे सुरुवात करण्यात आलेल्या “शेतकरी मित्र केंद्राच्या”उदघाटनप्रसंगी शेतकरी मित्र केंद्र शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी केले.
शहरातील मार्तंड रेणुका निवास, काझी हॉस्पीटलच्या मागे, समर्थ लॉज जवळ, उस्मानाबाद या ठिकाणी क्रीडा समीक्षक सुनंदन लेले व जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते आज शेतकरी मित्र केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय महाडीक, जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार, पोलीस निरिक्षक श्रीकांत वेणुगुरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री. लेले म्हणाले की, शिवार संसद युवा चळवळ, शिवार फौंडेशन द्वारा संचलित या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या सामाजिक, आर्थिक, वैद्यकिय, शैक्षणिक, नोकरी संदर्भ, शासकीय योजना, स्वयंसेवी संस्था विषयी माहिती, सल्ला व मार्गदर्शन शासकीय प्रलंबित प्रश्नांसाठी पाठपुरावा, नाममात्र दरामध्ये शेतकऱ्यांसाठी ई-सेवा पुरवठा, विशेष त्रस्त शेतकऱ्यांसाठी समुपदेशनाद्वारे माहिती व सल्ला याचबरोबर शेतीविषयक माती परिक्षण, जोडधंदा व्यवसाय, कृषी निविष्ठा, सेंद्रीय शेती, आधुनिक शेती, झिरो बजेट शेती इत्यादी नाविन्यपूर्ण विषयाची माहिती व मदत मिळणार आहे याचा लाभ जिल्हयातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रबोधनाचे काम करत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात जे प्रश्न फक्त प्रबोधनाने  सोडविले जाऊ शकत नाहीत ते प्रश्न प्रत्येक आठवडयाच्या बैठकीत विनायक हेगाणा यांनी मांडले तर त्या प्रश्नावर प्रशासनाच्या वतीने निश्चित तोडगा काढून शेतकऱ्याचे समाधान होईल आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे शेतकरी मित्र केंद्रात आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढून अनेक शेतकऱ्यांना समाधान देण्याचा प्रयत्न होईल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना कोणत्याही समस्येविषयी सल्ला किंवा मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी 9623250838 या क्रमांकावर सपर्क साधावा किंवा शेतकरी मित्र केंद्रात प्रत्यक्ष येऊन भेटावे असे आवाहन विनायक हेगाणा यांनी केले.
या कार्यक्रमास एबीएएल कंपनी, अविनाश पावळ, निलेश दळवी, मंगेश पाठक यांचे सहकार्य लाभले. या वेळी शेतकरी व विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.